
जळगाव मिरर | १६ मे २०२३
राज्याच्या राजकारणात ठाकरे व शिंदे गटात सुरु असलेल्या वादावर तब्बल ११ महिने प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला. कोर्टाने सरकारच्या आणि राज्यपालांच्या कारभारावर ताशेरे ओढले खरे परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कायम राहिलं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निर्णय घेतील. परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांना विश्वास आहे की, हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल आणि शिंदे गटातील १६ आमदार अपात्र होतील. परंतु शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र वेगळं मत मांडलं आहे.
अजित पवार सोमवारी पत्रकारांशी बातचित करताना म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. २८८ पैकी यदाकदाचित त्या १६ आमदारांचा निकाल काही वेगळा (आमदार अपात्र ठरले) लागला. वेगळा निकाल लागणारच नाही म्हणा. पण समजा लागला तरी त्या निकालाचा सरकारच्या बहुमतावर कुठलाही परिणाम होणार नाही. दरम्यान, आता अजितदांदाचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या विसंगत मत व्यक्त केलं आहे.






















