
जळगाव मिरर | १४ मे २०२३
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पायाला भिंगरी लावून राज्यातील अनेक ठिकाणी विकासकामाचे भूमिपूजन करण्यासाठी दौरे करीत आहे. तर जिल्ह्यातील शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आता येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांच्या देखील बैठकीला सुरुवात झाली आहे. अवघ्या तीन महिन्यावर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाने व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी शिंदे गटाच्या सर्व नगरसवेकांची अजिंठा विश्रामगृहावर बैठक झाली. त्यात पक्ष संघटन वाढविण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यामुळे आता जळगाव शहरातील शिंदे गट कामाला लागला आहे.
श्याम कोगटा यांच्या अध्यक्ष- तेखाली झालेल्या या बैठकीला मनपातील शिंदे गटाचे गटनेते अॅड. दिलीप पोकळे, नगरसेवक गणेश सोनवणे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, मनोज चौधरी, कुंदन काळे, हर्षल मावळे, नगरसेविका ज्योती चव्हाण, प्रतिभा देशमुख यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी रेखा पाटील, शोभा चौधरी आशुतोष पाटील, सोहम विसपुते, भारती रंधे, निशा पवार, अजय देशमुख, ज्योती शिवदे व शेख इकबाल आदी उपस्थित होते.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाची प्रचंड पिछेहाट झाली. जळगाव बाजार समितीत हातची सत्ता गेली. खास करुन शिंदे गटाच्या सर्व आमदारांच्या मतदार संघात त्यांना फटका बसला. आता सर्वोच्च न्यायालयात सरकारला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पक्षात चैतन्याचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व त्यानंतर होणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पाहता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व नगरसेवकाने वॉर्डात जाऊन बैठका घेण्यासह सभासद वाढवावेत. नगरसेवकाने आपण केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे या बैठकीत ठरले.





















