मुंबई : वृत्तसंस्था
आठ दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमध्ये दोन दिवस तर नंतर गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे शिंदे गट कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अशातच आज दुपारी ते पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर आले. उद्या मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, पण आता ते नाही तर प्रहारचे बच्चू कडू उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू आणि इतर आमदार राज्यपालांना भेटून सरकारने ४८ तासांत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या बंडाळीमध्ये उद्या महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची दाट शक्यता आहे.
बच्चू कडू यांच्यासोबत त्याचे सहकारी काही अपक्ष आमदारही राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत अमावस्या आहे. भाजप उद्या राज्यपालांकडे अविश्वासाचे पत्र देऊ शकते. पण भाजप नेते सध्या पुढे येण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यासाठी ते दुसरा मार्ग निवडू शकतात. कडू हे राज्यपालांना ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे पत्र देतील. या पत्रावर शिवसेनेच्या गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांची सही असणार आहे. पत्र तयार आहे, रात्रीपर्यंत सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या जातील. या आमदारांमध्ये शिवसेना नाही तर अपक्ष आमदार अधिक असण्याची शक्यता आहे. तसे सूतोवाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेना आमदारांपेक्षा अपक्ष आमदारच पुढे होऊन राज्यपालांना ठाकरे सरकारविरोधात पत्र देतील, असे ते म्हणाले होते.
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचे दोन आमदार आहेत. त्यामुळे ते अविश्वासाचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. त्यामुळे मग भाजपला पुढे येण्याची गरज नाही. शिवसेनेचे आमदार जर आले तर त्यांना हिंदुत्व महत्त्वाचं होतं की सरकार पाडणं महत्त्वाचं होतं, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बच्चू कडू यांच्या मागणीनंतर फ्लोर टेस्ट झाल्यास भाजप आपले संख्याबळ दाखवू शकते. ही सर्व प्रक्रिया अमावस्याकरिता थांबली असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे उद्या सकाळी ८.३० वाजतानंतरच्या घडामोडी महत्त्वाच्या राहणार आहेत.