जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२४
दोन दिवसांपूर्वी राज्यात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 जणांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कालपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी महायुतीत नाराजीनाट्य सुरु झाले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक नेते हे नाराज झाले आहेत. या नाराज व्यक्तींमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचाही समावेश आहे. आता तानाजी सावंत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
तानाजी शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर मोठा बदल केला आहे. नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी काही तासांपूर्वी त्यांचे फेसबुक प्रोफाईल बदलले आहे. तसेच त्यांनी कव्हर इमेजही बदलली आहे. त्यात त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण हटवत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला आहे. त्यावर शिवसैनिक असे नमूद केले आहे.
तानाजी सावंत यांनी त्यांच्या सर्वच सोशल मीडिया अकाऊंटवर हा बदल केला आहे. त्यांच्या या बदलानंतर तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरित्या बंडाचाच इशारा दिल्याचे बोललं जात आहे. यामुळे सध्या सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. “तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या बातम्या आपल्या माध्यमातून वाचायला आणि पाहायला मिळत आहेत. त्यावरून सातत्याने सावंत साहेबांशी प्रतिक्रिया आणि बाईटसाठी विचारणा केली जात आहे. आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की, सावंत साहेबांना ज्यादिवशी या सगळ्याबाबत बोलायचे आहे, त्यादिवशी आपल्या सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क साधला जाईल. तोपर्यंत कृपया कुणीही बाईटसाठी पाठपुरावा करू नये, ही विनंती,” अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.