
जळगाव मिरर । २७ सप्टेंबर २०२५
जामनेर तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे शेतात फवारणी करत असताना विजेच्या धक्क्याने ३४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमोल भास्कर सपाटे असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मयत अमोल सपाटे यांनी गावातीलच एका शेतकऱ्याचे शेत निम्मे बटाईने कसण्यासाठी घेतले आहे. या शेतात त्यांनी कापूस पिकाची लागवड केली आहे. दरम्यान, शेतीच्या बांधावर तण नाशक औषधीची फवारणी करण्यासाठी अमोल सपाटे हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. फवारणीचा पंप भरण्यासाठी ते विहिरीजवळ आले. तर तेथेच त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने ते खाली पडले. दरम्यान, शेजारच्या शेतात फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याला अमोल सपाटे हे खाली पडलेले दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धावतच डिपीजवळ जाऊन वीज पुरवठा खंडीत केला व आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवले.
त्यानंतर झालेली घटना भ्रमणध्वनीवरून गावात सांगितली. दरम्यान, त्यांच्याच मदतीने अमोल सपाटे यांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, डॉ. नरेश पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु, त्यांचा काहिएक उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी अमोल सपाटे यांना मृत घोषित केले. तेथेच अमोल सपाटे यांच्या आईसह पत्न ीने टाहो फोडाला. या प्रकरणी डॉ. नरेश पाटील यांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे. कॉ. दीपक जाधव करत आहेत. मयत सपाटे यांच्या पश्चात आई, पत्नी, मोठा भाऊ, बहिण, २ मुली व १ वर्षांचा एकुलता एक मुलगा असा परिवार आहे.




















