जळगाव मिरर । १६ ऑक्टोबर २०२५
भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावात एक धक्कादायक घटना दि. १४ रोजी घडली असून, अवघ्या १६ वर्षीय तरुणाचे खडका येथील गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, एका अल्पवयीन तरुणास खडका येथील काही अज्ञात व्यक्तींनी किंग हॉटेलसमोर अडवले आणि त्याला मारहाण करत जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर खडका परिसरातील झाडा-झुडुपांमध्ये नेत त्याला चामडी पट्टा आणि फायटरने बेदम मारहाण करण्यात आली. या अमानुष मारहाणीमुळे निसार गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ भुसावळ येथील विघ्नहर्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले असून चेहरा, मेंदू व छातीवर गंभीर मार लागल्याचे निदर्शनास आले आहे. घटनेनंतर कन्हाळा गावाचे सरपंच मोहम्मद गवळी यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये सपकाळे व अडकमोल या तरुणांचा समावेश असल्याची माहिती सरपंचांनी दिली आहे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाकडे पोहोचले असून, पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सध्या पीडित तरुण बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्याचा जबाब नोंदवता आलेला नाही. मारहाणीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरु आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.