जळगाव मिरर | ३० जुलै २०२५
गावाजवळ असलेल्या गुरांच्या गोठ्यामध्ये गळफास घेऊन अजय दीपक पाटील (वय २१, रा. डोमगाव, ता. जळगाव) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. २८ जुलै रात्री डोमगाव येथे घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, डोमगाव येथे अजय पाटील हा तरुण वास्तव्यास असून तो एका कंपनीत कामाला होता. त्याच गावातील शेतकरी दीपक पाटील यांच्या मालकीच्या गुरांचा गावाजवळच गोठा आहे. त्या ठिकाणी अजय हा गेलेला होता. यावेळी गोठ्यातच अजय पाटील या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. गावातील काही जणांना तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती अजयच्या कुटुंबियांना दिली. त्यांनी लागलीच गोठ्याकडे धाव घेत अजयला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
