
जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२५
तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या आयोजित रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या रॅलीला टॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आणि टीव्हीकेचे संस्थापक विजय थलापती उपस्थित राहणार होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमस्थळी सुमारे ३०,००० लोकांची गर्दी झाली होती. विजय यांचे भाषण होणार असल्याने राज्यभरातून समर्थकांनी येथे मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मात्र, त्यांच्या आगमनाला सहा तासांहून अधिक उशीर झाल्याने गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. एकाच वेळी अनेक लोकांनी स्टेजकडे धाव घेतल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. अपघातात महिलांसह काही लहान मुलांचाही समावेश असून, गंभीर जखमींवर करूर आणि तिरुची येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तात्काळ आपत्कालीन मदतकार्य सुरू करण्यात आले असून, गर्दी हटवण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल मागवण्यात आले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा अपेक्षित आहे. टीव्हीके पक्षाच्या रॅलीमुळे यापूर्वीही गर्दी आणि वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाल्याचे प्रकार घडले होते. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा रॅलींसाठी काही अटी घातल्या होत्या, परंतु त्या पाळल्या गेल्या नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक चौकशीचे आदेश देण्यात आले असून, आयोजकांनी घेतलेल्या परवानग्या, खबरदारीची उपाययोजना आणि पोलिस बंदोबस्ताचा तपशील तपासला जात आहे.




















