जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२५
शहरातील श्रीकृष्ण कॉलनी परिसरात सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका वृद्ध महिलेला लक्ष्य करून दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची चेन असा एकूण ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, श्रीकृष्ण कॉलनीतील सुनंदा सुधीर महाजन (वय ६५) या सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी होत्या. याच वेळी दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत आणि सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेऊन पोबारा केला. वृद्ध महिलेने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेनंतर महाजन यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, रात्री ११ वाजता दोन अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उल्हास चन्हाटे हे करीत आहेत.
