जळगाव मिरर | ३० जुलै २०२५
बीड जिल्हा कारागृहातून एक “स्पेशल” मोबाईल फोन सापडल्याने खळबळ उडाली आहे. या फोनचा वापर आका उर्फ वाल्मीक कराड करत असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. हा फोन आणि त्याचे कॉल डिटेल्स तपासले गेले, तर अनेक काळेबेरे उघडकीस येतील, असेही ते म्हणाले.
धस यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना कृषी खात्यातील कथित 169 कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरला. त्यांनी या प्रकरणासंबंधी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून चौकशी अहवालाची मागणी केली.
महादेव मुंडे हत्या प्रकरणावर बोलताना धस म्हणाले, “त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबासह गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्या माऊलीची काय चूक? मारेकरी अजूनही मोकाटच आहेत.” त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.
जेलमधून सापडलेला फोन उघड करेल अनेक रहस्यं
रोहित पवारांनी नुकतीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ‘आका टोळी’ अद्याप सक्रिय असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले, “मी आधीच अनेक वेळा हे मुद्दे मांडले आहेत. आता काही बोलणार नाही. पण जेलमधून आका वापरत असलेला छोटा फोन सापडलेला आहे. त्याचे कॉल डिटेल्स काढल्यास सर्व साखळी उघड होईल.”
अजित पवारांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची तयारी दाखवली आहे. यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, “ही राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाब आहे, मी त्यावर बोलणार नाही. मात्र प्रकाश साळुंखे यांनी क्लीन चिटच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले आहे.”
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना धस म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य निर्णय घेतील. एवढ्या मोठ्या प्रकरणावर मी बोलणे योग्य ठरणार नाही.”
