
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२६
अमळनेर शहरात भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूच्या डंपरने पायी जाणाऱ्या वृद्धाला जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली असून, उपचारादरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरुद्दीन शेख अब्दुल (वय ६५, रा. जोशीपुरा, पिंपळे रोड, अमळनेर) हे १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास धुळे रस्त्यावरून पायी जात होते. त्याचवेळी (एमएच ४१, बीटी २०२१) क्रमांकाचा वाळूचा डंपर भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांनी शेख यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शेख गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने रिक्षाद्वारे अमळनेर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना १३ एप्रिल रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात डंपर चालक रोशन खराटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





















