
जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२६
रस्त्याने पायी जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नशिराबाद येथे घडली. मुरलीधर कृष्णा माळी (वय ४९, रा. दत्त मंदिराजवळ, नशिराबाद, ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर माळी हे दि. २४ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावातील दत्त मंदिर परिसरातून सॉ मीलजवळून पायी जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात माळी गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहेत. अपघात घडवून आणणाऱ्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.





















