जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२६
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य चित्रकला व किल्ले बनविण्याच्या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील १० तालुक्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याने परिसरात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले.
तसेच सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत भाऊचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी शिवचरित्र, स्वराज्य स्थापना, देशभक्ती, किल्ले व विविध ऐतिहासिक प्रसंग या विषयांवर कल्पकतेने चित्रे रेखाटली. चित्रकला स्पर्धेत एकूण ९८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये गट क्र. १ (इ. १ली ते ५वी) मध्ये ३४५, गट क्र. २ (इ. ६वी ते ८वी) मध्ये ५४५ तर गट क्र. ३ (इ. ९वी ते ११वी व खुला गट) मध्ये ९५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी शिवचरित्र, स्वराज्य, मावळ्यांचे शौर्य, देशभक्ती, किल्ले व विविध ऐतिहासिक प्रसंग या विषयांवर प्रभावी चित्रे साकारली. लहान गटातील विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेतून आकर्षक रंगसंगती सादर केली. यातून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन दि. १९ फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
सकाळी ८.०० ते १२.०० या वेळेत छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह शेजारील मैदानावर गडकिल्ले तयार करण्याची स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांनी रायगड किल्ला, विशालगड किल्ला आदी ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक व देखण्या प्रतिकृती साकारल्या. माती, कागद, थर्माकोल व इतर साहित्यांचा वापर करून साकारलेल्या या प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी किल्ल्यांची बांधणी, रचना व ऐतिहासिक वैशिष्ट्ये यांचे अचूक सादरीकरण केले. किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत एकूण ३१ किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या. या स्पर्धेत ९३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जागरूकता निर्माण होऊन स्वराज्याच्या संकल्पनेबद्दल अभिमानाची भावना दृढ होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असून उत्कृष्ट कलाकृतींना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रसंगी तहसीलदार सुरेश कोळी व शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी केली व त्यांचे कौतुक केले. विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते




















