
जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२६
अमळनेर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दि.२३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता मंगरूळजवळ पोलीस असल्याचे सांगत दुचाकीस्वारांना मारहाण करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड भागातील रहिवासी शैलेश पुखराज पाटील हा २३ रोजी रात्री मंगरूळ येथे आपल्या मित्रांसोबत जेवायला जात होता. या वेळी मागाहून येणाऱ्या चारचाकी (एमएच ०५, जीडी- ९१२५) वरील चालकाने जोरजोरात हॉर्न वाजला आणि पुढे जाऊन गाडी थांबवली. यानंतर चारचाकी चालकाच्या बाजूच्या व्यक्तीने जोरजोरात शिवीगाळ सुरु केली. याबाबत जाब विचारला असता चारचाकी चालकाने शैलेशचा मित्र राहुल याला मारहाण सुरू केली. तर बाजूच्या व्यक्तीने शैलेशच्या छातीत जबर बुक्का मारला आणि डाव्या हाताच्या बोटांना चावून जखमी केले.
त्याचवेळी काही लोकांनी ते भांडण सोडवले. त्यानंतरही त्यातील एकाने दमबाजी करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी वाहन एका बाजूला लावून मित्राला बोलावून पुन्हा त्यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी शैलेश पाटील याने अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. प्रमोद पाटील करत आहेत.





















