जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२५
येत्या नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्र कार्य संचालनालयातर्फे मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सुरु होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी रोहन धुगे यांनी दि. 24 ऑक्टोबर रोजी तातडीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाची पाहणी करत सदिच्छा भेट दिली. यावेळी रंगकर्मींना स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृह उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वस्तही केले. यावेळी रंगकर्मीमध्ये नवीन उत्साह संचारला असून त्यांनी जिल्हाधिकार्यांचे यावेळी आभार मानले.
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचा मक्ता हा एका खासगी संस्थेकडे होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी हा मक्ता सोडल्याने नाट्यगृह ओस पडले होते. दरम्यान, नाट्यगृहाची कोणतीही टेंडर प्रक्रिया निघाली नसल्याने स्थानिक रंगकर्मींची हक्काची मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा होणार कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी शहरातील रंगकर्मींनी एकत्र येत जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा केला. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकार्यांनी नाट्यगृहाला भेट देत रंगकर्मींच्या सर्व अडी-अडचणी ऐकून घेत यावर लवकरात लवकर तोडगा काढून मराठी हौशी स्पर्धा ही 15 नोव्हेंबरला नाट्यगृहात होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी दिलेल्या सूचना आणि निर्माण होणार्या समस्या या समस्त रंगकर्मीनी ऐकून घेत त्यावर तोडगा कसा काढला जाईल, यावर चर्चा विनिमय करण्यात आले. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी.पाटील, कनिष्ठ अभियंता मुकेश सोनवणे, ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यकर्मी चिंतामण पाटील, रमेश भोळे, शंभू पाटील, अनिल मोरे, डॉ.वैभव मावळे, गौरव लवंगले, विशाल जाधव, हर्षल पाटील, अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर, नाट्यगृहाचे तांत्रिक सहाय्यक विजू पाटील आदी उपस्थित होते.
नाट्यगृहाचा मक्ता ऐरणीवर
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह मुळात महानगरपालिका यांनी हातात घेणे गरजेचे असले तर एका खासगी संस्थेने ते व्यवस्थितरीत्या सांभाळले. मात्र, आता त्यांनी मक्ता सोडल्याने हे नाट्यगृह कोण चालवणार, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर जिल्हाधिकार्यांनी तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मत येथील स्थानिक रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे.
समिती नेमण्याची मागणी
कोणत्याही संस्थेला हे नाट्यगृह चालवण्याचा मक्ता देण्यात आला तर त्यावर शिक्षित आणि ज्येष्ठ रंगकर्मींची समिती नेमण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. कारण कोणत्याही संस्थेला हे नाट्यगृह देण्यात आले तर मनमानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्थानिक रंगकर्मींची समिती नेमून ती या नाट्यगृहाची देखरेख करण्याची मागणी रंगकर्मीकडून होताना दिसत आहे.
निर्णय कौतुकास्पद
जिल्हाधिकार्यांनी स्थानिक रंगकर्मींच्या मागणीला तत्परतेने होकार देत नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचे सांगितले, यामुळे त्यांच्या या निर्णयाचे खरंच कौतुक आहे. असे निर्णय घेणारे हे पहिलेच जिल्हाधिकारी असल्याने त्यांच्या सूचना आणि निर्णयांचे नेहमीच स्वागत करण्यात येईल.
ज्येष्ठ रंगकर्मी – रमेश भोळे
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात स्थानिक रंगकर्मींची स्पर्धा घेण्यासाठी येथील सुविधांसाठी पाहणी केली. यावेळी येथील समस्या जाणून घेण्यात आल्या आणि यावर तात्पुरता आणि कायमस्वरुपी तोडगा कसा काढण्यात येईल, यासाठी चर्चा करण्यात आली. महानगरपालिका, बांधकाम विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत निर्णय घेण्यात येतील. दरम्यान, ज्या मूलभूत सुविधा येथे नाही, त्यासाठी लवकर काम पूर्ण करून हे नाट्यगृह उपलब्ध करून देण्यात येईल.
जिल्हाधिकारी – रोहन घुगे




















