जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच जालना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयामुळे रागाच्या भरात एका पित्याने आपल्या तीन मुलांची हत्या केली. या घटनेप्रकरणी आरोपी संतोष धोंडीराम ताकवाले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. गावातील विलास सोळुंके यांच्या शेतात असलेल्या विहिरीत तीन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना दिसले, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. शिवानी (वय ८), दिपाली (वय ६) आणि सोहम (वय १२) अशी मृत मुलांची नावे आहेत. आपल्या पित्याकडूनच आपली हत्या होईल असा विचारही या मुलांच्या मनात कधी आला नसेल. मात्र डोक्यात संशय गेल्याने रागाच्या भरात संतोषने हे पाऊल उचलल्याचं दाखल तक्रारीवरून समजत आहे.
मुलांना बाहेर काढल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर अंमलदार रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणी मुलांच्या पित्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, अशी शंका पतीच्या मनात होती. यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यातून पतीने आपल्या मुलांना संपवल्याचं फिर्यादिने म्हटलंय. सदर घटनेनंतर संतोष गावातून फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. आई-वडिलांच्या भांडणाची शिक्षा निष्पाप मुलांना सहन करावी लागल्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जातेय.