
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२५
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्याच्या जंगलात ३० ते ४० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यामुळे खळबळ माजून गेली आहे. तसेच महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात असून त्यादिशेने तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतावरील अतिदुर्गम भाग असलेल्या गाडऱ्या जामन्या भागात कोरड्या तलाव आहे. या क्षेत्रातून वन विभागाचे कर्मचारी जात असतांना त्यांना तलावात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी दुपारच्या सुमारास पथकाला दिसून आला. त्यांनी या घटनेची माहिती यावल पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आढळेली महिला ही ३० ते ४० वयोगटातील असून तीचा मृतदेह पुर्णपणे कुजलेला आहे. त्यामुळे या महिलेचा मृत्यु कशामुळे झाला याची माहिती अद्यापर्यंत समोर आलेली नाही.
महिलेचा मृतदेह घनादाट जंगातील तलावात संशयास्पदरित्या आढळून आला. त्यामुळे महिलेसोबत घातपात झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला. त्या महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेत यावलहून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.