
जळगाव मिरर | २४ मे २०२५
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत अमळनेर उपविभागाने उल्लेखनीय कामगिरीची नोंद करत संपूर्ण नाशिक विभागात सर्वोत्तम उपविभाग म्हणून आपली वेगळी छाप पाडली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचा सन्मान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. विभागीय आयुक्त नाशिक डॉ. प्रवीण गेडाम यांची या वेळी विशेष उपस्थिती होती.
‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत विविध महसूल विषयक उपक्रम, नागरिक केंद्रित सेवा, दस्ताऐवजांचे सुलभीकरण, ई-हक्क नोंदणी, महसूल अभिलेखांचे अद्ययावतकरण, जलद निर्णय प्रक्रिया, वादांचे त्वरित निराकरण, तक्रार निवारण यंत्रणा यासारख्या बाबींमध्ये अमळनेर उपविभागाने उल्लेखनीय प्रगती साधली. उत्कृष्ट नियोजन, गतिमान अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून या यशाला गवसणी घालता आली.
हा सन्मान म्हणजे अमळनेर उपविभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून प्रशासनात नवी कार्यसंस्कृती आणि पारदर्शकतेचा संदेश देणारा आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी वर्ग, लिपिक, कोतवाल, ग्रामसेवक आदी सर्व घटकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले.
यावेळी जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांचाही स्वतंत्रपणे गौरव करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गाव नकाशे, फेरफार नोंद, जमिनीच्या मोजण्या, तसेच स्थानिक पातळीवरील लोकाभिमुख उपक्रम यामध्ये त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय ठरले.
या यशस्वी कामगिरीमुळे अमळनेर उपविभागाने महसूल कार्यप्रणालीच्या उत्कृष्टतेचे एक नवे प्रतिमान उभे केले असून राज्यातील इतर उपविभागांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.