
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२६
खान्देशातील धुळे शहराजवळील एका गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मोहाडी पोलीस ठाणे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात संबंधित तरुणी सुमारे सहा महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक प्रकृती बिघडल्याने तिला देवपूर परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान ती सुमारे 24 आठवड्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणले. दरम्यान, गर्भपात करण्याच्या उद्देशाने तिने काही औषधांचे सेवन केल्याची माहिती समोर आली. मात्र या औषधांचे अतिसेवन झाल्याने तिची प्रकृती झपाट्याने खालावली. रक्तदाब कमी होणे, झटके येणे अशी गंभीर लक्षणे दिसू लागल्याने डॉक्टरांनी तातडीने तिला हिरा शासकीय रुग्णालय येथे हलवण्याचा सल्ला दिला.
यानुसार तिला अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही तिची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
औषधे कोणी दिली? पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी सहा महिन्यांच्या गर्भासाठी औषधे कोणी उपलब्ध करून दिली, ती कुठून मिळाली आणि यामागे कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे बेकायदेशीररित्या औषधांची उपलब्धता आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून येत्या काही दिवसांत या प्रकरणातील अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















