
जळगाव मिरर | १६ मार्च २०२६
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विकास कामादरम्यान आज मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक निर्माणाधीन स्लॅब (साचा) कोसळल्याने सात कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसराचा पर्यटन विकास प्रकल्पमार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून राबवला जात आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी विविध बांधकामांची कामे सुरू आहेत. मात्र आज काम सुरू असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत सात कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेमुळे बांधकाम स्थळावरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामगारांना आवश्यक असलेली सेफ्टी शूज, हेल्मेट व इतर सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली होती का, तसेच कामगारांचा विमा काढण्यात आला होता का, याबाबतही आता चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, बांधकामात हलगर्जीपणा झाला का, याचा तपास प्रशासनाकडून केला जाणार असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.




















