जळगाव मिरर | १८ नोव्हेबर २०२३ | जळगाव- चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणे गावानजीक वळणावर चारचाकी गाडी उलटल्याने एक जागीच ठार, तर तीनजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. हे वळण धोकादायक बनले असून या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. या अपघातात मृताचे नाव अरुण मोरे (४५, रा. घोगरगाव, ता. जामखेड) असे असून जखमी संदेश सुनील कोठारी (३९), रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा. (जामखेड) यांच्यावर चाळीसगावला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीनंतर जामखेड, ता.जामखेड येथील रहिवासी चारचाकी गाडीने क्रमांक एम.एच. १६ सी.व्ही. २२७७ जळगाव येथून जामखेड येथे जात होते. दरम्यान, हिंगोणे (ता. चाळीसगाव ) जवळील वळणावर अचानक आलेल्या खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटून झाडावर आदळली. गाडी झाडात अडकल्याने प्रवाशांना बाहेर काढता येत नव्हते. दरम्यान, खासदार उन्मेष पाटील चाळीसगावकडे जात असताना ते घटनास्थळी थांबले. तत्काळ चाळीसगाव येथून रुग्णवाहिका व कटर मागविले. गाडी कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढले. चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर यात अरुण मोरे (४५) रा. घोगरगाव, ता. जामखेड यांचा मृत्यू झाला.