
जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२६
राज्यातील विविध जिल्ह्यांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे करून पोलिसांना सातत्याने चकवा देणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला अखेर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीच्या अटकेमुळे पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली असून अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत अचूक नियोजन करत सापळा रचला. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना आरोपीच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि योग्य संधी साधत त्याला जेरबंद केले.
सादिक अली उर्फ ‘आतंक’ हा जळगाव जिल्ह्यासह वर्धा, बुलढाणा, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चैन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तो सतत ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण झाले होते.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे खरे नाव अयमद खान बशीर खान (वय २९, रा. मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) असे असल्याचे समोर आले आहे. तो मागील आठ वर्षांपासून फरार होता आणि विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते.
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून ही कारवाई यशस्वी केली. आरोपीच्या अटकेमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा तपास वेगाने पुढे जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





















