जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२४
छत्रपती संभाजीनगरात आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर हा सर्व प्रकार घडला. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्या प्रकरणातवर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने हा सर्व प्रकार घडला. उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धाव घेतल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना अखेर लाठीचार्ज देखील करावा लागला. या सर्व प्रकरणामुळे संभाजीनगर मधील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.
दिशा सालियन प्रकरणांमध्ये ज्याप्रकारे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सत्तेत असताना कारवाई थांबवली होती. या विषयावर आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो आहोत. आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये थांबले असल्याचे आम्हाला कळाले होते. त्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकारी येथे आल्या आहेत. दिशा सालियन यांच्या मर्डर केसचे काय झाले? याचा जाब आम्ही विचारणार असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या वेळी म्हटले आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे हॉटेल रामा मध्ये मुक्कामी होते. भाजपच्या वतीने या ठिकाणी दिशा सालियान प्रकरणात निषेध आंदोलन करण्यात आले. तर शिवसेनेच्या वतीने देखील भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. एकाच वेळेस सेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.