जळगाव मिरर | २० मार्च २०२४
महाविकास आघाडीची अद्याप लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली नसून नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असताना अंबादास दानवेंनी आपण लोकसभेचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत इच्छूक असल्याचं सांगितलं आहे. तर चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंसोबत कोणताही वाज नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुलडाण्याला जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते. त्यावेळी हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये उद्धव ठाकरे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जवळपास एक तासभर बंद दाराआड चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून खैरे आणि दानवे यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर ही चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, या चर्चेतून काय तोडगा निघाला आहे, हे अद्याप अस्पष्टच आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षश्रेष्ठीकडून लोकसभेचा उमेदवार कोण हे अजून जाहीर झालेलं नाही. त्यामुळं जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत आपण इच्छुक असल्याचं अंबादास दानवे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांनी आपल्यात आणि दानवे यांच्यात कुठलाही वाद नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता दानवेंच्या वक्तव्यामुळे टेन्शन वाढल्याचं वातावरण आहे.
उद्धव ठाकरे यांनी १७ मार्च रोजी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंना मातोश्रीवर बोलावलं होतं. यावेळी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर ते मुंबई असा एकत्र प्रवास केला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ देखील त्यांच्यासोबत होते. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिंमागील दहा वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं दानवेंनी सांगितलं होतं. तर चंद्रकांत खैरे नेहमीच आपल्याला डावलत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारीचा निर्णय मातोश्रीहून होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती.