
जळगाव मिरर | ३ मे २०२४
उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कारकीर्दीत चांगली कामे करण्याची संधी होती. त्यावेळी त्यांनी कधीही घराबाहेर पडून कामे केली नाहीत. आता सत्ता गेल्यानंतर त्यांच्याकडे शिव्याशाप देणे आणि टोमणे मारण्यापलीकडे दुसरे काहीही काम उरलेले नाही. महायुतीचे सरकार चांगले काम करीत असल्यामुळे लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे महायुतीचे सर्वाधिक खासदार संसदेत पोहोचतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली. त्यावेळी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मुख्यमंत्री बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे एका मुलाखतीवरून स्पष्ट झाले. याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करून, शिंदेंना बाजूला सारून पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती. मात्र ज्यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून काँग्रेसच्या छत्रछायेखाली जाण्याचा मार्ग स्वीकारला, त्यांना सोडून शिवसैनिकांनी हिंदुनिष्ठ भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण शिवसेनाच ठाकरे यांच्या हातातून निसटल्यामुळे ते कोणत्या अधिकाराखाली ही ऑफर देत होते, ते त्यांनाच माहीत असावे. आता आमच्यासमवेत राष्ट्रवादी, राज ठाकरे यांची मनसे आणि इतर छोटे पक्ष आल्यामुळे महायुतीची ताकद वाढली असल्याचे शिंदे म्हणाले.
शांतीगिरी महाराजांनी भरलेल्या अर्जाबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.