
जळगाव मिरर | ७ जून २०२५
राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगात जाऊ शकतो, असा दावा करून कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील मिठी नदी स्वच्छता प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. याच प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा अर्थात आदित्य ठाकरे तुरुंगाची हवा खाऊ शकतो, असे ते म्हणालेत.
गत काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे गट व मनसेच्या संभाव्य युतीची चर्चा झाली आहे. या प्रकरणी अटकळींचा बाजार गरम झाला असताना कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी उपरोक्त दावा केला आहे. तसेच ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचीही खिल्ली उडवली आहे. ते धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अभिनेता डिनो मोरिया याच्या मागे सध्या ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्याला मातोश्रीची सून म्हणून ओळखतात. त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू करण्यात आली आहे.
त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो. अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे. कारण, डिनो मोरिया संध्याकाळी कुणासोबत बसायचा व उठायचा. कुणाबरोबर त्याचे भावनिक, आणि कदाचित शारीरिक संबंध असू शकतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावरून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले.
नीतेश राणे यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने 2024 ला एकाला 20 आमदार दिले, तर दुसऱ्याला शून्य दिला. बापरे, त्यांच्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे आम्ही एवढे घाबरलो आहोत की, आम्हाला झोप लागत नाही. भाजपला, आमच्या जिल्हाध्यक्षांना आता आपले कसे होणार हा विचार करून घाम आला आहे. आमच्याकडे 132 आमदार आहेत. आमची त्यांच्याशी कशी तुलना होणार? असे ते उपरोधिकपणे म्हणाले. दरम्यान, नीतेश राणे यांनी यावेळी ठाकरे ब्रँड हिंदुत्व सोडले तेव्हाच संपला असा दावाही केला.





















