
जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२६
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील एका ३७ वर्षीय तरुणाचा जळके गावाजवळील धोकादायक वळणावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मृत तरुणाचे नाव रवींद्र रुपचंद चव्हाण (वय ३७, रा. वसंतवाडी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र चव्हाण हे २० एप्रिल रोजी घरातून कामानिमित्त बाहेर गेले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, रवींद्र चव्हाण हे आपल्या मोटारसायकल (क्रमांक MH 19 EK 3530) ने वावडद्याकडून घरी परतत असताना जळके गावाजवळील एका धोकादायक वळणावर त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर ते रस्त्याच्या कडेला असलेल्या केळीच्या शेतात मोटारसायकलसह पडलेले आढळले.
सदर घटना शेतमालक नथ्यु पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ जळके येथील पोलीस पाटील संजय चिमणकारे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी चेहरा पाहून हा मृत व्यक्ती रवींद्र चव्हाण असल्याची ओळख पटवली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यास तसेच नातेवाईकांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला. मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती.
दरम्यान, संबंधित वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून तीन ते चार जणांचा जीव गेला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या धोकादायक वळणावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.





















