जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२५
नवरात्रौत्सवाच्या समाप्तीवेळी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना गिरणा नदीपात्रात वाहून गेलेल्या हेमेश संतोष पाटील (१८, रा. मयूरेश्वर कॉलनी, दादावाडी परिसर) या तरुणाचा २० दिवसांनंतर शोध लागला. मुलाचा शोध घेत असताना अखेर त्याचा मृतदेहच दोनगाव शिवारात पाटील कुटुंबाच्या हाती लागला. ऐन भाऊबीजेदितशीच मृतदेह सापडल्याचा दुर्दैवी योग आला व बहिणीने भावाला तिरडीवर अखेरचे ओवाळले. या प्रसंगाने सर्वच गहिवरून गेले होते.
निमखेडी रेल्वे पुलाजवळ ऑक्टोबर रोजी हेमेश हा मित्रांसोबत देवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेला असताना विसर्जन केल्यानंतर पाय घसरून तो नदीपात्रात पडून वाहून गेला होता. त्यावेळी त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो सापडला नव्हता. त्यानंतरही त्याचा शोध सुरूच होता. हेमेशला एक जुळा भाऊ व एक बहीण आहे. हा तरुण दोन वर्षांचाच असताना त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईनेच तिघा मुलांचा सांभाळ केला. आता मुले मोठी झाली आणि पुन्हा ही दुःखद घटना घडली. त्यात ऐन भाऊबीजेच्या दिवशी हेमेशला अंतिम निरोप देत असताना बहीण रोहिणी हिने त्याला तिरडीवरच अखेरचे ओवाळले. या वेळी तिच्यासह सर्वांनाच शोक अनावर झाला होता. अखेर दोनगाव शिवारात गिरणा नदीपात्रामध्ये एक तरुण दिसल्याची माहिती काही मुलांनी पोलिस पाटलांना दिली. त्यानंतर पोलिस व पाटील कुटुंबीय तेथे पोहोचले.
गेल्या २० दिवसांपासून हेमेशचा शोध लागला नव्हता. दोनगाव शिवारात त्याचे कुटुंबीय पोहोचले त्या वेळी त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटली. मुलाचा मृतदेह पाहून पाटील कुटुंबाला शोक अनावर झाला होता. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.




















