जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४
गेल्या सहा दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या जयेश प्रकाश विसपुते (वय ४३, रा. दिनकर नगर) यांचा असोदा शिवारातील विहिरीत शुक्रवार दि. १६ रोजी सकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दिनकर नगरात जयेश विसपुते हे वास्तव्यास होते. ते मानसिक रुग्ण असल्याने अनेकदा ते घरातून निघून जायचे. गेल्या सहा दिवसांपूर्वी दि. १० फेब्रुवारी रोजी विसपुते हे घरातून निघून गेले होते. दोन दिवस त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून न आल्यामुळे त्यांनी दि. १२ फेब्रुवारी रोजी शनिपेठ पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, त्यांचा शोध सुरु असतांना शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी असोदा शिवारातील किशोर काळे यांच्या शेतातील विहरीत जयेश विसपुते यांचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.
घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच, पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे, पोहेकॉ विलास शिंदे व ज्ञानेश्वर कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नागरिकांच्या मदतीने त्यांनी विहरीतून जयेश विसपुते यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर जयेश यांच्या कुटुंबिय त्याठिकाणी आले असता, त्यांनी जयेशची ओळख पटविली. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.