जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२५
एरंडोल शहरातील सावता माळीनगरमधील रहिवासी गुलाबराव गिरधर पाटील (७१) यांचे पुत्रवियोगात पुत्राच्या तेराव्याच्या दिवशीच सायंकाळी निधन झाले. अवघ्या १३ दिवसांच्या कालावधीत आधी पुत्र, नंतर पिता यांच्यावर क्रूर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक गुलाबराव गिरधर पाटील सेवा पूर्ण केल्यानंतर एरंडोल येथे सावता माळीनगरमध्ये परिवारासह वास्तव्यास होते. त्यांचे पुत्र प्रकाश गुलाबराव पाटील हे सोनबर्डी येथे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले. त्यामुळे अनेक विद्यार्थी घडवले गेले. मात्र, दीर्घ आजाराने त्यांना ग्रासले. उपचार करूनही शेवटी नको ते असे घडले. प्रकाश पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने पाटील परिवारावर मोठे संकट कोसळले. शोक आक्रोशाच्या वातावरणात १३ दिवस निघून गेले. त्यादिवशी पित्र पूजन झाल्यावर गुलाबराव पाटील यांना सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. अवघ्या १३ दिवसांच्या कालावधीत घरातील दोघांना क्रूर काळाने हिरावून नेले. त्यामुळे आक्रोश, शोक व वियोगात हा परिवार पुन्हा बुडून गेला.