शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२८ स्लाईस सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण
जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२६
आतापर्यंत मोठ्या तपासण्यांसाठी गरिबांना खासगी रुग्णालयात जावे लागत होते. मात्र, आता आपल्या शासकीय रुग्णालयातच अद्ययावत आणि अधिक क्षमतेची सिटीस्कॅनची सोय उपलब्ध झाल्याने जिल्हयातील गोरगरीब रुग्णांची आर्थिक लूट थांबेल. जळगावच्या आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. केवळ मशिनरीच नाही, तर पुरेसे मनुष्यबळ आणि औषधसाठा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘१२८ स्लाईस सीटी स्कॅन मशीन’चा भव्य उद्घाटन समारंभ सोमवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, प्रांताधिकारी विनय गोसावी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला फीत कापून सिटीस्कॅनच्या नवीन विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर अद्ययावत मशीनची पूजा करून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सेवा लोकार्पित केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, क्ष किरण विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी मशिनरीविषयी माहिती पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांना सांगितली. यावेळी अध्यायावत मशीनविषयी पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मशिनरीचे काम कसे चालते याविषयी प्रत्यक्ष मॉनिटरिंग कक्षातील वैद्यकीय पथकाच्या युनिटसोबत खुर्चीवर बसून सविस्तर माहिती मान्यवरांसह जाणून घेतली.
यावेळी शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जगदीशचंद्र वठार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता पदवीपूर्व डॉ. रमेश वासनिक, पदवीपूर्व परिचर्या महाविद्यालयाचे प्राचार्य पुष्पेंद्र निकुंभ, मुख्य अधिसेविका संगीता शिंदे, दोन्ही प्रशासकीय अधिकारी डॉ. डॅनियल साजी, संजय चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर्स अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या १२८ स्लाईस सीटी स्कॅन मशीनमुळे रुग्णांच्या निदानाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होणार आहे. विशेषतः हृदयविकार, अपघात आणि गंभीर आजारांच्या वेळी तातडीने रिपोर्ट मिळण्यासाठी या मशिनचा मोठा फायदा होणार आहे. शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळणार आहे. या सुविधेमुळे जळगावच्या आरोग्य क्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला गेला असून, खाजगी रुग्णालयांच्या महागड्या चाचण्यांपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.





















