जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२६
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा बीड येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 1600 मीटर धावण्याच्या मैदानी चाचणीदरम्यान दीपक भास्कर वावळ (रा. परळी, जि. बीड) हा तरुण अचानक कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये सध्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू असून आज मैदानी शारीरिक चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांची 1600 मीटर धावण्याची फेरी सुरू असताना दीपक वावळ याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्याला चक्कर येऊन तो मैदानावर कोसळला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने त्याला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती गंभीर झाली होती. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दीपक वावळ हा परळी तालुक्यातील रहिवासी असून पोलिस बनण्याच्या स्वप्नाने तो भरती प्रक्रियेसाठी बीड येथे आला होता. आपल्या मुलाने पोलिस दलात भरती व्हावे, या आशेवर असलेल्या वावळ कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत कोणत्याही अमिषांना बळी पडू नये, तसेच स्टेरॉईडसारख्या घातक औषधांचा वापर करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वापर आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पोलिस भरती प्रक्रियेत धावणे, गोळाफेक आणि इतर मैदानी शारीरिक चाचण्यांचा समावेश असतो. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




















