जळगाव मिरर / २३ फेब्रुवारी २०२३ ।
जळगाव तालुक्यातील विटनेर येथील एका धार्मिक स्थळावर पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जानेवारी महिन्यात समोर आला होता. याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
विटनेर येथील एका धार्मिक स्थळावर पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार १८ जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ता हेमंत गुरव यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी याबाबत पोलिस पाटलांना माहिती दिल्यानंतर कारवाईची मागणी केली होती.
मात्र, कुठलीही कारवाई न झाल्यामुळे गुरव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयात कामकाज होऊन नुकतेच न्यायालयाने एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अॅड. केदार भुसारी व अॅड. धनराज झोपे यांनी कामकाज पाहिले.