जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५
राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरु असताना आता अमरावती जिल्ह्यातील बडनेरा तालुक्यात एका विवाह समारंभात अत्यंत धक्कादायक आणि ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील दृश्याला शोभेल असा जीवघेणा हल्ला उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर दोन आरोपींनी धारदार चाकुने सपासप वार केले. विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढण्याचा संपूर्ण थरार लग्नाच्या शूटिंगसाठी आणलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सूजल राम समुद्रे या तरुणाचे मंगळवारी रात्री लग्न होते. बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे शेकडो पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा सुरू होता. मंगलमय वातावरणात लग्न सुरू असताना अचानक जितेंद्र राघो बक्षी आणि त्याच्या एका साथीदाराने स्टेजवर प्रवेश केला. कोणताही आगाऊ इशारा न देता त्यांनी नवरदेव सूजल याच्यावर जीवघेणा हल्ला करत धारदार चाकूने भोसकले. या हल्ल्यात नवरदेव सूजल गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विवाहस्थळी मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, कॅमेरामनने तातडीने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करत हल्ला करून पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींचा पाठलाग सुरू केला. ड्रोनमध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी हल्ला करून पळून जाताना स्पष्ट दिसत आहेत. नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला आणि ते दुचाकीवरून पळून गेले. हा सगळा थरार आणि पाठलागाची दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली असून, हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, काही दिवसांआधी माझ्या मुलाची बडनेरामध्ये राहणाऱ्या दोन युवकासोबत बाचाबाची झाली होती. तेव्हा, त्या दोन्ही आरोपींनी धमकी दिली होती की तुझ्या लग्नात येऊन लग्नात धिंगाना करू, काल हल्ला झाल्यावर आम्ही भीतीपोटी लग्न थांबवले आहे. जोपर्यंत पोलिस आरोपींना पकडून कडक शिक्षा करत नाहीत, तोपर्यंत आम्ही दहशतीच्या सावटाखालीच राहणार, त्यामुळे, पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी.



















