सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी स्विकारला पदभार; आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ‘द बेस्ट चाळीसगाव’ साकारण्याचा केला निर्धार
चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक व विक्रमी विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. जनतेच्या आशीर्वादाने भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्षासह २४ नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या पार्श्वभूमीवर भागवत एकादशीचा मुहूर्त साधत दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी चाळीसगाव नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण, मुख्याधिकारी श्री.सौरभ जोशी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या स्मारकाला आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी अभिवादन केले व पायी जात नगरपालिकेत प्रवेश केला.
यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मनोगतात नगराध्यक्षा व नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा देत, विजयाचे यश डोक्यात न जाऊ देता पुढील पाच वर्षे अविरत लोकसेवा करावी, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे व विकासाभिमुख कामे करावीत, असा संदेश दिला. चाळीसगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण म्हणाल्या की, १०६ वर्षांची परंपरा असलेल्या चाळीसगाव नगरपालिकेत सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेली प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा होण्याचा मान चाळीसगावकरांच्या आशीर्वादाने मला मिळाला आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेली चाळीसगावची लेक व सून शहराची प्रथम नागरिक बनली, ही बाब माझ्यासाठी अभिमानासोबतच मोठी जबाबदारीची आहे.
नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक चाळीसगावकराला ही संस्था आपली वाटली पाहिजे, यासाठी प्रशासकीय सुधारणा करण्यात येतील. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल प्रणालीद्वारे नागरिकांना घरी बसल्या सेवा देण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्पष्ट बहुमत असले तरी नगरपालिकेच्या कामकाजात पक्षीय भेद बाजूला ठेवून निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाच्या मताचा सन्मान केला जाईल. शहराच्या हितासाठी दिलेल्या योग्य सूचनांवर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन ते साडेतीन वर्षांत शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत नागरी सुविधांमध्ये भरीव सुधारणा झाल्या असून ‘द बेस्ट चाळीसगाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.





















