
मुक्ताईनगर प्रतिनिधी : प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनने विविध मागण्यांसाठी दि. 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दि. 23 एप्रिल 2026 रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
असोसिएशनची बैठक
आज मुक्ताईनगर येथे तालुका कृषी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पाटील, सचिव योगेश पाटील आणि उपाध्यक्ष धीरज जैन यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विक्रेता बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीला इतर सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने व्यवसाय बांधव उपस्थित होते.
पुढील दिशा ठरणार
बैठकीत संपाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दि. 23 एप्रिल रोजी निवेदन दिल्यानंतर पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी माफदा अध्यक्ष महोदय श्री विनोदभाऊ तराळ यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले.
कृषी विक्रेत्यांमध्ये एकजूट
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले. संपादरम्यान तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.






















