जळगाव मिरर | २० जुलै २०२४
राज्यातील गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर सुरु असतांना दरम्यान, हवामान विभागाने कोकण , मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात आज शनिवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. गेल्या २४ तासांत गोवा आणि कोकणात मुसळधार ते अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये सर्वाधिक २१ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईतही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट क्षेत्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकतो. त्यानंतर ४-५ दिवसांत पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
ओडिशा किनाऱ्यावरील मान्सूनच्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आज २० जुलै रोजी विदर्भ, दक्षिण छत्तीसगडमध्ये अतिवृष्टी पावसाची शक्यता आहे. तर ओडिशाचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील ४-५ दिवसांत गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ३५.५ फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, रुकडी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकूड, बाचणी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.