जळगाव मिरर | १९ जुलै २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव काळीपिवळी जीप विहिरीत कोसळली. या विचित्र अपघातात सात जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. जालना – राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारातील वसंतनगर येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पंढरपूरहून परतणारे ६ वारकरी, तर एका प्रवासी महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी पाच जण बदनापूर तालुक्यातील चनेगावचे, एक भोकरदन तालुक्यातील तुपेवाडी, तर एक जण खामखेडा येथील आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भोकरदन तालुक्यातील चनेगाव, तुपेवाडी, राजूर येथील भाविक हे १५ दिवसांपूर्वी आषाढीनिमित्त पंढरपूर येथे अगस्त ऋषी महाराज तपोवन यांच्या दिंडीत पायी गेले होते. गुरुवारी दुपारी ते पंढरपूरहून एसटीने जालना बसस्थानकावर आले. पंढरपूरच्या यात्रेमुळे बसेसची संख्या कमी असल्याने ते काळीपिवळी (एमएच २१-३८५०) जीपमध्ये बसून राजूरकडे निघाले हाेते. या वाहनात १४ पेक्षा जास्त प्रवासी असल्याचाही संशय आहे. त्यामुळे हे चारचाकी वाहन विहिरीबाहेर काढल्यानंतरही पाण्यात गळ टाकून मृतदेहांची शोधमोहीम उशिरापर्यंत सुरू होती. जालना,भोकरदन व अंबड येथील प्रत्येकी एक अग्निशमन दलाचे वाहनही मदत कार्यासाठी येथे दाखल झाले होते. अपघाताची माहिती मिळताच राजूर, तपोवन, तुपेवाडी, वसंतनगर तांडा भागातील रहिवाशांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. दहा ते बारा मिनिटांतच बचावकार्य सुरू केले.
तरुणांनी दोरीच्या साहाय्याने पाण्यात उतरून प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, तर जखमींवर उपचारांचा खर्च सरकार करणार आहे, अशी माहिती आमदार नारायण कुचे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांनी हे जाहीर केले. जवळपास १४ जण कोंबलेले होते. राजूर ८ किमीवर असताना एका दुचाकीस्वार अचानक जीपसमोर आला. त्याला वाचवण्याच्या नादात जीपचालकाचे नियंत्रण सुटले व भरधाव जीप रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा फूट अंतरावरील कठडे नसलेल्या विहिरीत कोसळली. पोलिस येण्यापुर्वीच काही मृतदेह तसेच जखमी प्रवाशांना नागरिकांनी विहिरीबाहेर काढले. काही वेळातच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले व क्रेनच्या साहाय्याने जीपही बाहेर काढण्यात आली. जखमींना राजूर येथील रुग्णालयात, तर काहींना जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गंभीर जखमींची नावे
भगवान मालुसरे (रा. तपोवन), आर. पी. तायडे, सखुबाई प्रल्हाद महाजन (दोघे रा. चनेगाव, ता. बदनापुर), चालक बाबूराव हिवाळे ( मानदेऊळगाव, ता. जालना) हिंमत चव्हाण (तपोवन तांडा,ता. बदनापूर), ताराबाई गुळमकर ( चनेगाव, ता. बदनापूर), अशोक पुंगळे (रा. राजूर, ता. भोकरदन) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.