जळगाव मिरर | १२ नोव्हेंबर २०२५
राज्यातील शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मंगळवारी दापोली येथे झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदम यांचा भाऊ अण्णा कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण हे माझ्या मुलाकडून दहा लाखांची खंडणी मागायला भुरट्या चोरांना पाठवतात. त्यांचं काही चुकत नाही, कारण त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे कमावणारा आहे, अशा शब्दांत भास्कर जाधवांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. अलीकडेच मुंबईतील एका डान्सबारशी संबंधित वादात कदम आणि त्यांचा मुलगा अडकले होते, त्यावरून भास्कर जाधव यांनी ही टीका केली.
कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्याचाही प्रयत्न केला. घाबरून जाऊ नका, दापोली असो की खेड, आपण तयार आहोत. काहीही घडलं तरी दापोली तालुका छमछमला बळी पडणार नाही, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला. आगामी निवडणुकीत विजय मिळवायचा आहे. आजपासून मेहनत घ्या, म्हणजे उद्या फळ मिळेल, असं सांगत त्यांनी आज पेरा म्हणजे उद्या उगवेल, या धोरणाचा संदेश दिला. त्यांच्या भाषणात विरोधकांवर टीकेसोबतच पक्षबांधणीची दिशा दिसून आली.
या मेळाव्यात भास्कर जाधवांनी संघटनशक्ती आणि शाखाप्रमुखांच्या भूमिकेवरही जोर दिला. आज शाखाप्रमुख आमदाराने हाक मारली नाही, तर कोपऱ्यात रुसून बसतो. जो कोपऱ्यात बसतो, त्याचं गावात वजन काय असणार? शाखाप्रमुख तोच जो अंगात आग लागल्यासारखा सतत काम करत राहतो, असे ते म्हणाले. त्यांनी जुन्या काळातील शिवसेनेच्या कार्यपद्धतीची आठवण करून दिली. पूर्वी सभा असल्यावर जीप, बस नसत. आम्ही ट्रकमध्ये बसून, कधी मागे लटकून सभा गाठायचो. शाखाप्रमुख शेवटच्या गाडीतून यायचा, कारण तो आधी लोकांना पाठवायचा, असं सांगत त्यांनी जुन्या काळातील कार्यकर्त्यांची जिद्द अधोरेखित केली.
भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना संघटित राहण्याचं आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं. शिवसेना फक्त पक्ष नाही, ती भावना आहे. तुम्ही जर तुमचं काम प्रामाणिकपणे केलंत, तर लोक तुमच्यासोबत उभे राहतील, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना घराघरात पक्षाची भूमिका पोहोचवण्याचा सल्ला दिला. दापोली आणि खेड या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाचे बालेकिल्ले टिकवण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलं.



















