जळगाव मिरर | २६ जून २०२३
पाचोरा शहरातील मोंढाळे रोड वरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवार पहाटे उघडकीस आल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून यात जितेंद्र राजु राठोड (वय – १९) व साक्षी सोमनाथ भोई (वय -१८), असे प्रेमी युगलाचे नाव आहे. तर घटनेची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि साक्षी या दोघांनी मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आलेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पीएसआय वसावे मॅडम, पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे हे घटनास्थळी दाखल झालेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. तर दोघांनी आत्महत्या का केली?, तसेच इतर माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पीएसआय वसावे मॅडम यांनी दिली.