जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर नेहमीच या ना त्या गुन्हेगारीने चर्चेत असतांना जळगाव जिल्हा पोलीस दलाने गेल्या काही दिवसात भुसावळातील सराईत गुन्हेगारांना हद्दपार देखील केले आहे. तरी देखील भुसावळात खुनाची घटना घडली आहे. राज्यभर दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना भुसावळ शहर मात्र खुनाच्या घटनेने हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ दि.२४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्यांनी प्राणघातक हल्ला केल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनावर आधीच बंदोबस्तावर असतांना रात्री झालेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
शहरातील मध्यवर्ती परिसरात दिलीप जोनवाल ( वय ४९, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ ) यांचा खून झाल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या कृत्याला पूर्व वैमनस्याची जोड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. तर मयत दिलीप जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती देखील समोर आली आहे.