जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षस्थानी होते तर पक्षाचे निरीक्षक प्रसन्न पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, अरुण पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, शहराध्यक्षा मंगला पाटील, वाल्मीक पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नाना पाटील, डॉ. सुरेश सूर्यवंशी, रिटा बाविस्कर, जिल्हा समन्वयक विकास पवार यांची देखील बैठकीला उपस्थिती होती. यावेळी आ.एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. यावेळी खडसे यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला.
आ.खडसे म्हणाले कि, राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. आश्वासने देऊन विविध समाजाची दिशाभूल या सरकारकडून होत असून, राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती तयार झाली आहे. आगामी काळात चांगला पर्याय म्हणून जनता राष्ट्रवादी काँग्रेसकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
खडसे म्हणाले, की आजची राजकीय स्थिती वादळी झाली आहे. राज्यात सरकारविरुद्ध वातावरण आहे. जनता सरकारच्या विरुद्ध आहे. मनोज जरांगे-पाटलांचे उपोषण सुरू झाले, तेव्हा सरकारने ४० दिवसांचा अवधी मागून घेतला. मात्र, या दिवसांत सरकारने बैठक घेतली नाही. आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे मराठा समाजाचा उद्रेक रस्त्यावर झाला. सरकारच्या हलगर्जीमुळे हे घडले.