जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३
राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेकांना दारू पिण्याचे व्यसन असते, या व्यसनाच्या आहारी जावून अनेकांचे संसार उघड्यावर पडत असतात, अशीच एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. एका परिसरातील वडील दारू पिवून नेहमी घरातील सदस्यांना शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने त्रास देणाऱ्या वडिलांना मुलाने हत्या घटना उघडकीस अली आहे. मुलाने हत्या केल्यानंतर मृतदेह शिंगणापूर घाटात टाकून देण्यात आला होता. या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा करत मुलाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील शिंगणापूर नातेपुते रोडवर भवानी घाटात १५ नोव्हेंबरला अनोळखी इसमाचा खून झाल्याची माहिती उघडकीस आली. याबाबत सखोल चौकशी केली असता खून झालेली व्यक्ती ही माळशिरस तालुक्यातील कोंडबावी येथील असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांशी संबंध साधला. यावेळी मृत व्यक्तीचा मुलगा सुरज सावंत याने मृतदेह ओळखून तो माझे वडील पांडुरंग चंद्रकांत सावंत यांचा असल्याचे सांगितले. तसेच सुरज पांडुरंग सावंत याच्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करण्यात सुरूवात केली.
तपासात गोपनीय माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी चौकशीसाठी मयताचा मुलगा सुरजला ताब्यात घेतले. चौकशीत मुलाने मृत पांडुरंग सावंत हे मागील अनेक वर्षांपासून घरातील लोकांना दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करून त्रास देत असल्याने त्यांच्या त्रासास कंटाळून लोखंडी गजाने मारहाण करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर वडिलांचे प्रेत पिशवीमध्ये भरून प्रेत नातेपुते येथील शिंगणापूरच्या घाटात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून दिल्याचेही त्याने सांगितले. या गुन्ह्यात मृत पांडुरंग सावंत यांची पत्नी संगीता हिचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला देखील अटक करण्यात आली आहे.