जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
राज्यातील काही जिल्ह्यात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला. तसेच 72 तासाच्या आत पिक विमा कंपन्यांना माहिती देण्यासाठी ऑफलाईन सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, 72 तासांत पंचनामे नाही, तर केवळ माहिती देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीला अनुसरून अतिवृष्टीमुळे आज वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तसेच ठिकठिकाणी नेटवर्क चालत नाही. त्यामुळे मोबाईल वरून देखील माहिती देता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कालच संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना तसेच हिंगोली, परभणी, नांदेड यांच्यासह सर्व जिल्हाधिकऱ्यांना तात्काळ कंपन्यांना आदेश काढून ऑफलाईन सुद्धा माहिती देण्याची सुविधा देण्याची सूचना केली आहे. कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक आणि मंडळ अधिकाऱ्यांना देखील तातडीने ऑफलाइन 72 तासाच्या आत माहिती घेण्याचे आदेश दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.