जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२४
जळगांव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी पदासाठी 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहिर झाला. महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यातील तलाठी भरतीसाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने हे जिल्हे वगळून उर्वरीत 23 जिल्ह्यातील तलाठी भरतीचा निकाल घोषीत करण्यात आलेला असून दर्जी फाऊंडेशनच्या 5 विद्यार्थ्यांनी यश मिळविलेले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमधील जळगांव शहरातील प्रतिक्षा गोविंदराव अंधारे यांना 182 गुण मिळालेले असून त्यांची धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरती करीता निवड झालेली आहे. यशानंतर प्रतिक्षा अंधारे यांनी दर्जी फाऊंडेशनमध्ये भेट दिली त्यावेळी फाऊंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर दर्शन हरिष लोहे या विद्यार्थ्यांने 200 पैकी 194 गुण मिळविलेले असून त्याची नागपूर जिल्ह्यातील तलाठी पदाकरिता निवड झालेली आहे. दिग्विजय विनोद कोकाटे-बीड, आरती अंबादास नरे-बुलढाणा, चैताली राजेंद्र सोनवणे-छत्रपती संभाजी नगर या विद्यार्थ्यांची देखील विविध जिल्ह्यातील तलाठी पदाकरिता निवड झालेली आहे.
शासकीय नोकरी हे अनेक तरूणांचे स्वप्न असते. परंतु योग्य मार्गदर्शन मिळाले तरच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळते. तलाठी पदाकरिता दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश आनंददायी असून जळगांव, धुळे, नंदूरबारसह इतर 13 जिल्ह्यातील तलाठी पदाचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबलेला असून या जिल्ह्यांमध्ये देखील दर्जी फाऊंडेशनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होतील. असे मत प्रा.गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा.गोपाल दर्जी यांच्यासह सौ.ज्योती दर्जी व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.