
जळगाव मिरर | ६ मार्च २०२६
बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या सतीश दिलीप चौधरी (वय ३५) याला बदलापूर पोलिसांनी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, अनेक महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या स्त्रीबीजांची मागणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश चौधरी हा मूळचा चहार्डी, ता. चोपडा येथील रहिवासी आहे. मात्र गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो कुटुंबासह नाशिक येथे वास्तव्यास होता. नाशिकमध्ये राहात असतानाच त्याचा बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या टोळीशी संपर्क आला. या टोळीच्या माध्यमातून त्याने काही व्यक्तींना बनावट आधारकार्ड बनवून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसाठीही बनावट आधारकार्ड तयार करून दिले होते. योगायोगाने तोच इसम स्त्रीबीज तस्करी प्रकरणात पकडला गेला. या प्रकरणाची माहिती मिळताच सतीश चौधरी याने नाशिकमधील आपला ठावठिकाणा बदलत चहार्डी येथे आश्रय घेतला. मात्र बदलापूर पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत चोपडा पोलिसांच्या मदतीने चहार्डी येथील त्याच्या राहत्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली.
या कारवाईत तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक केशव हासगुळे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. संशयिताच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यातील आयव्हीएफ केंद्रांबाबतही प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली आहे. राज्यातील सुमारे ८६० आयव्हीएफ केंद्रांची गृह आणि आरोग्य विभागाकडून संयुक्त तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील काही आयव्हीएफ केंद्रेही पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतीश चौधरीच्या अटकेनंतर या प्रकरणात काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. जळगाव आणि चोपडा परिसरातील काही व्यक्तींनाच नव्हे, तर नाशिक आणि बदलापूर येथे आयव्हीएफ उपचारासाठी जाणाऱ्या काही रुग्णांनाही त्याने बनावट आधारकार्ड बनवून दिल्याचा संशय पोलिसांना आहे.
या संपूर्ण प्रकरणातील तस्करीचे जाळे उलगडण्यासाठी गुन्हे शाखेची पाच पथके विविध ठिकाणी तपास करत आहेत. या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.




















