जळगाव मिरर | २४ मार्च २०२४
देशात लोकसभा निवडणूक सुरु झाली असून राज्यात अजून देखील महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले नसून भाजपच्या उमेदवारांनी गाठीभेटी घेणे सुरु देखील केले असतांना बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे, भाजप नेत्या प्रीतम मुंडे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे तिन्ही मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ गडावर आले होते. पंकजा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच तिघेही गोपीनाथ गडावर आले. यामुळे बीडच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळाले.
दरम्यान धनंजय मुंडे म्हणाले की, आम्ही तिघे गोपीनाथ गडावर आलो आहोत, ही माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. ताईला उमेदवारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या वेशीवरच त्यांचे स्वागत करणार होतो. पण त्या म्हणाल्या की, तू पालकमंत्री आहेस, तर तू घरी थांब मी भेटायला येते. माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे. तिचं स्वागत करायला मी इथे असणे हे माझे काम आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तर भाऊ म्हणून पंकजाच्या पाठिशी असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रीतम, पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. या तिघांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेची मी उमेदवार आहे. त्यामुळे मी आज गोपीनाथ गडावर आले आहे. मी ठरवले होते की, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी जावून त्यांच्याशी चर्चा करावी. आमच्या काकींचे आणि अण्णांचे आशिर्वाद घ्यावेत. पण धनंजय यांनी सांगितले की तेच गोपीनाथ गडावर येत आहेत, असे पंकजा म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी इथे माझ्या भावाला भेटले पण घरी जाऊन जिल्हाच्या पालकमंत्र्यांना मी भेटेन. त्यांच्याशी चर्चा करेन. आज माझं लोकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे. आज माझ्या स्वागताला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रतिम मुंडे आल्या आहेत. विचार करा मी किती तगडी उमेदवार आहे…, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.