जळगाव मिरर / १५ फेब्रुवारी २०२३ ।
अमरावती येथून मालेगाव येथे नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या इनोव्हा कारने अचानक पेट घेतला. यातून नवरदेवासह पाचजण सुखरूपपणे बचावले आहेत. ही थरारक घटना मंगळवारी पहाटे ६ वाजता भडगाव तालुक्यातील कजगाव नजीक घडली आहे.
अमरावती येथील रोहन हरी डेंडूळे यांचे मंगळवारी मालेगाव येथे लग्न होते. त्यासाठी ते नातेवाइकांसह इनोव्हा कारने (एमएच २७ बीव्ही ७९५६) निघाले होते. कजगावनजीक गाडीमधील चालकाच्या वायर जळाल्याचे लक्षात आले. कार रस्त्याच्या बाजूला घेत असतानाच तिने पेट घेतला. चालकाने लागलीच कारमधील पाचही जणांना खाली उतरवले आणि काही मिनिटांतच कार जळून खाक झाली.
कारला लागलेली आग विझवण्यासाठी रस्त्यावर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने कार काही मिनिटांत जळून खाक झाली. गाडीने पेट घेताच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. आग मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याने जाणारी वाहन थांबली होती. या थरारक घटनेतून नवरदेव रोहन डेंडुळे, आकाश शिवदास डेंडुळे, पूजा आकाश डेंडुळे, वैशाली अमर बागरे आणि चालक राहुल वैराळे असे पाचजण सुखरूप बचावले आहेत. मागून आलेल्या वरातीच्या वाहनातून नवरदेव व इतर लोक मालेगावकडे रवाना झाले.
