जळगाव मिरर / ९ मार्च २०२३
महाराष्ट्र कबड्डी क्षितीजावर खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावून जिल्हा संघांचे सर्वसामान्य अस्तीत्व अधोरेखीत करणारी मानाची कबड्डी स्पर्धा म्हणून महाराष्ट्र शासन पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचा थरार जळगांवकरांना ११ ते १४ मार्च दरम्यान अनुभवायला मिळणार. या स्पर्धेची सुरुवात क्रीडा व युवक कल्याण संचनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९९७ साली युती शासन काळात सुरु करण्यात आली. २००१ पर्यंत ही स्पर्धा शिवशाही चषक कबडी स्पर्धा म्हणून ओळखली जात होती. २००२ पासून ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक या नावाने ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्र असोसिएशन व विदर्भ असोसिएशन अश्या दोन विभागातून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत जळगाव जिल्हा कबड्डी असो.चे सरकार्यवाह नितीन बरडे यांनी माहिती दिली.
जळगांव येथे होणारी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा ही २१ वी स्पर्धा असून आजपर्यंत झालेल्या स्पर्धामध्ये १४ स्पर्धा या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने तर ६ स्पर्धा या विदर्भ कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या आहेत. २१ वी शिवछत्रपती महाराज चषक कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य असोसिएशन व जळगांव जिल्हा कबड्डी असोसिशन यांच्या यजमानपदाखाली मा.ना. गिरीषभाऊ महाजन क्रीडा मंत्री व मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा ११ मार्च ते १४ मार्च या कालावधीत जळगांव येथील सागर पार्क मैदानावर रोज सायंकाळी ५ ते १० या वेळेत प्रकाश झोतात संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेकरीता महाराष्ट्र शासनाकडून रोख रक्कम रुपये २० लाख ची पारितोषिके व सन्मानचिन्ह उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. स्पर्धेकरीता पूर्वतयारी म्हणून मैदानावर मॅटची ४ क्रीडांगणे व ५००० प्रेक्षक क्षमता असलेली भव्य गॅलरी असून खेळाडूंच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून विविध जिल्हयातील जवळपास ४४८ खेळाडू, ४५ पंच, ३० तांत्रिक सदस्य व इतर बाहेर जिल्हयातील मंडळी येणार असून सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने Live प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आलेली असून तांत्रिक समितीच्या वतीने स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आलेली असून दोन्ही गटात तुल्यबळ संघ खेळतांना दिसणार आहेत.
पुरुष विभाग
अ-गट:- -मुंबई शहर, सांगली, कोल्हापुर, अमरावती
ब-गट – अहमदनगर, नाशिक, पुणे, वाशिम,
क-गट:- मुंबई उपनगर, धुळे ठाणे, नागपूर
ड. गट:- नांदेड, रत्नागिरी, नंदुरबार, वर्धा
महिला विभाग
अ-गट:- पुणे, कोल्हापुर, रत्नागिरी, नागपूर
ब-गट:-मुंबई शहर, मुंबई उपनगर, धुळे, अमरावती
क-गट:- नंदुरबार, ठाणे, रायगड, बुलढाणा
ड गट:- पालघर, नाशिक, नांदेड, अकोला
या गटवारी प्रमाणे २० जिल्हयांचे ३२ संघ स्पर्धेत सहभागी होतील. यामध्ये प्रो कबड्डी छत्रपती पुरस्कार प्राप्त व राष्ट्रीय खेळाडू आपापल्या जिल्हयाकडून सहभागी होणार असून जळगांव करांना या खेळाडूंचा दर्जेदार खेळ अनुभवास मिळेल. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगांव विधानसभा आमदार मा. सुरेश दामु भोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, सुनंदा पाटील, मिनल थोरात, एम.के.पाटील, सुजाता गुलाणे, जगदीश चौधरी, गुरुदत्त चव्हाण व जळगांव जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष शाम कोगटा, डॉ. नारायण खडके, डॉ. प्रदीप तळवेलकर, सरकार्यवाह नितीन बरडे, गिरीष नाईक, सुनिल राणे, हितेश सोनी, अनिल कोळी, सुरेश पाटील, कमलेश पाटील, आनंद महांगडे, दिपक वाल्डे, चैत्राम पवार, अरुण गावंडे, अलेक्झांडर मणी व हरीश शेळके इत्यादि सर्व मेहनत घेत आहेत.