जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२३
कामावरून घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ३२ वर्षीय तरुणाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात मंगल इघन बाविस्कर (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनार येथील मंगल बाविस्कर हा तरुण मजुरीचे कामे करत होता. दरम्यान १८ डिसेंबरला सकाळी कामावर गेला होता. गिरणा नदीपात्रात सध्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने नदी बऱ्यापैकी वाहती झाली आहे. काम आटोपून मंगल सायंकाळी घरी परतत असताना गिरणा नदी पात्रातील नेहमीच्या पायवाटेने येत होता. मात्र नदी ओलांडत असताना पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला. सदरचा प्रकार लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी शोध घेतला. काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, दोन दिवस मृतदेह हाती लागला नाही.
अखेर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तो नेण्यात आला. मयताच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले आहेत. एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.